ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. त्यानुसार आता महापालिकेनेदेखील ठाणे शहरासाठी परिपत्रक काढून काय सुरू राहील, काय बंद राहील याची माहिती दिली आहे. परंतु असे असतानाही गुरुवारी सकाळी ठाण्यातील मार्केटमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने नागरिकांनी खरेदीचे कारण देऊन गर्दी केल्याचे दिसून आले, तर कळव्यातील भाजी मार्केटमध्येही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मुख्य मार्केटमध्ये जाण्यास मज्जाव करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात येत होते. तरीदेखील नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत होते.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेनेदेखील शहरात काय सुरू राहील, काय बंद राहील याची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पातलीपाडा, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितीन कंपनी, तिनहात नाका येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांची कसून चौकशी करूनच सोडले जात होते. परंतु, नेहमीपेक्षा गुरुवारी संचारबंदीच्या पहिल्या दिवशी वाहनांची वर्दळ कमी होती. परंतु रिक्षा, सार्वजनिक वाहतूक, खासगी बस सुरू असल्याने त्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली दिसत नव्हती. नागरिक सहज या सेवांतून प्रवास करताना दिसत होते. तसेच शहरातील इतर ठिकाणीदेखील तुरळक प्रमाणात वर्दळ दिसत होती. कळव्यातही भाजी मार्केटमध्ये सकाळीच गर्दी झाल्याचे दिसत होते. घोडबंदर भागात सकाळच्या सत्रात मॉर्निंग वॉकला नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते, तर शहरापासून दूरच्या ठिकाणी असलेल्या भागांमध्येही नागरिकांची कमी-जास्त प्रमाणात वर्दळ दिसून आली. यामुळे १०० टक्के संचारबंदीचे पालन नागरिकांनी केलेले दिसले नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका तरीदेखील किती टक्के बंद आहे, हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते.
नागरिकांकडून पळवाटा शहरातील जांभळीनाका, स्टेशन परिसरातील मार्केटमध्येदेखील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने येथे सकाळी नागरिकांची गर्दी दिसत होती. या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. तरीदेखील पळवाटा काढून नागरिक अत्यावश्यक सेवेचे कारण देऊन येथे ये-जा करताना दिसत होते.