लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : रिलायन्स, गेल कपनींची गॅस पाईपलाईन व उच्च दाबाच्या वीजवाहक तारां वाहून नेण्यासाठी उभारलेल्या टॉवरकरिता तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे ३० ते ४० मीटरचा शेतजमिनींचा हरितपट्टा संपादित करण्यात आला आहे. तशा नोंदी त्या त्या सातबारावरही करण्यात आल्या आहेत. या जमिनीत शेतकऱ्यांना शेती पूरक कोणतेही व्यवसाय अथवा बांधकाम करता येत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहेत. अत्यल्प मोबदला देवून जमिनी लाटल्याने व या शेतीत काहीही करता येत नसल्याने ह्या भूसंपादनालाच हरकत घेण्याची वेळ आल्याची म्हणत या परिसरात इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यामुळे या प्रकल्पांमुळे पर्यावरणालाच बाधा निर्माण होत असल्याने गॅस पाईपलाईन व टॉवर हटवून शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या कराव्यात असे मत भाजपाचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील यांनी दैनिक लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. या परिसराला शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन लागू केल्याने पाईपलाईन लाईन व टॉवर हे पर्यावरणाच्यादृष्टीने बाधा आणणारे ठरत आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्याने रिलायन्स कंपनी नव्याने टाकत असलेली गॅस पाईपलाईन जुन्या पाईपलाईन लगत न टाकता इको सेन्सिटिव्ह झोन क्षेत्रापलिकडून टाकत आहे. त्यामुळे अगोदरच या प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त आता नव्याने असंख्य शेतकरी बाधीत होणार आहेत. या परिसराला इको सेन्सिटिव्ह झोन लागू असल्याने पर्यावरणाला बाधा पोहचत असल्याने इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत असलेली पाईपलाईन व टॉवर हटवून झोन पलीकडील क्षेत्रातून नेत शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनी मोकळ्या करा व शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदी कमी कराव्यात अशी मागणी असल्याचे पाटील म्हणाले. या संदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील प्रश्न उपस्थित केला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच वरील गावांतील बाधीत शेतकरी वाड्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देणार असून आगामी काळात ही पाईपलाईन हटवावी म्हणून आंदोलनही उभारणार असल्याचेही ते म्हणाले.
संपादित जमिनी मोकळ्या करा!
By admin | Published: July 17, 2017 1:02 AM