डोंबिवली : शहरातील कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाता यावे, यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठोपाठ आता मनसेनेही विनामूल्य बससेवा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी ही बससेवा उपलब्ध करून दिल्याने आगामी केडीएमसी निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्याची जोरदार चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.
मनसेकडून ७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता बस सुटणार आहेत. या बसना चिपळूण, हातखांबा, राजापूर, लांजा, तरळा, नांदगाव, कणकवली, कसाल, कट्टा, चौके, मालवण अशा ११ महत्त्वाच्या गावी थांबे देण्यात येणार आहेत. नागरिकांनी त्यासाठी २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत गणेश मंदिरानजीकच्या मनसेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत नोंदणी करावी. त्यासाठी येताना आधारकार्ड घेऊन यावे, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, भाजपतर्फे गणेशोत्सवासाठी मोदी स्पेशल ट्रेन कोकणात सोडण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आणखी काही ट्रेन सोडाव्यात, तसेच मोदी स्पेशल ट्रेनला दिवा येथे थांबा द्यावा, अशी मागण्या प्रवासी संघटनांनी केल्या आहेत.
-------------------