प्रज्ञा म्हात्रे, ठाणे अरेरावी, उर्मट वर्तणूक देणाऱ्या रिक्षाचालकांची प्रतिमा जनमानसातून बदलावी, यासाठी रिक्षाचालक मोहन कचरे यांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे. आपल्या वडिलांपासून हा वसा घेतलेले कचरे हे अपंगांना मोफत प्रवास सेवा देत असून प्रवाशांसाठी फ्री वायफाय, मोबाइल रिचार्ज, वैद्यकीय सुविधा, थंड पाणी आदी सर्वसोयींनी त्यांची रिक्षा सज्ज आहे. घड्याळ आणि कॅलेंडरदेखील त्यांच्या रिक्षात आहे. त्यांच्या परिसरात राहणारे शालेय विद्यार्थी मोहनकाकांच्या रिक्षाची रोजच वाट पाहत असतात.शांत स्वभावाचे आणि समाजासाठी आपले काही देणे आहे, अशी भावना मनात असलेले मोहन कचरे यांनी सर्व रिक्षाचालकांसमोर आपला आदर्श ठेवला आहे. टापटीप असलेली त्यांची रिक्षा सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. त्यांच्या रिक्षातील सोयीसुविधा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र, त्यांचे कौतुक केल्याशिवाय एकही प्रवासी रिक्षातून बाहेर पडत नाही. दमूनभागून आलेल्या प्रवाशाला थंड पाणी मिळाल्यास त्याचा अर्धा थकवा तिथेच निघून जाईल, या उद्देशाने त्यांनी थंड पाण्याची बाटली रिक्षात ठेवली. तसेच, मनोरंजनासाठी फ्री वायफाय आणि एफएमचीदेखील व्यवस्था केली. एकदा रिक्षात एक प्रवासी बसले होते. त्यांना शुगरचा त्रास होता. त्यांच्या अंगाला घाम यायला लागला. आजूबाजूला काही मेडिकल शॉप न दिसल्याने कचरे यांनी धावतपळत जाऊन त्यांच्यासाठी एक चॉकलेट आणले आणि त्यांचा थोडा त्रास कमी झाला. तेव्हापासून त्यांनी चॉकलेट ठेवण्यास सुरुवात केली. प्रवासी म्हणून एखादे लहान मूल रिक्षात आल्यावर त्यालाही ते चॉकलेट देतात. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप समाधान देऊन जातो, असे ते सांगतात. तसेच, अचानक कोणाची तब्येत बिघडल्यास त्यांच्यासाठी औषधेही त्यांनी आपल्या रिक्षात ठेवली आहेत. एखादेवेळी रात्रीचा प्रवास करताना मोबाइलमध्ये पैसे नसल्यास त्या प्रवाशासाठी त्यांनी रिचार्जची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. मोबाइल रिचार्जचे मात्र ते पैसे घेतात. तसेच, रिक्षाच्या एका बाजूला त्यांनी घड्याळ आणि दुसऱ्या बाजूला कॅलेंडर ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यांना स्वत:ला वर्तमानपत्र वाचण्याची आवड असल्याने एक वर्तमानपत्र त्यांनी आपल्या रिक्षात प्रवाशांसाठी ठेवले आहे. दिवसातून एक तरी अपंग प्रवासी मला भेटतो आणि त्याला मी मोफत सेवा देतो. यात मला आनंद आहे, असे कचरे सांगतात. त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे अपंगांसाठी मोफत प्रवास, असे लिहिले आहे.
अपंगांना मोफत सेवा देणारी रिक्षा!
By admin | Published: April 21, 2016 2:18 AM