ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा देखील लालपरीला पंसती दिली आहे. त्यानुसार एसटीच्या बस फुल्ल होत असतांनाच याच चाकरमान्यांना कोकणात मोफत पाठविण्याची सुविधा अनेक राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यानुसार आपल्या बसचे आरक्षण करण्यासाठी काही राजकीय मंडळींनी मोफत तिकीट बुकींगची सेवा सुरु केली आहे. परंतु त्यात मोफत एसटी सेवा हवी असेल तर आधी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवा अशी टाकली आहे. त्यामुळे त्याचा फायदा कदाचित आगामी निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागण्यासाठीची ही खेळी नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.सध्या कोकणातील ठाणे स्थित चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यानुसार यंदा एसटीच्या लालपरीला देखील अधिक पसंती दिली जात आहे. त्यानुसार एसटीने १५०० बसचे नियोजन आखले आहे. त्यात आतापर्यंत ७०० च्या आसपास बस फुल्ल झाल्याअसून त्यातही ग्रुप बुकींगला अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे.त्यातही कोरोनानंतर विविध राजकीय पक्षांकडून कोकणात जाणाºया चारमान्यांसाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी चारकमानी देखील आता मोफत प्रवास करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या एसटीचे तिकीटही वाढले असल्याने प्रवाशांचा देखील या मोफत सेवाला प्राधान्य देण्यासाठी पुढाकार दिसत आहे. त्यानुसार वागळे इस्टेट पासून ते अगदी दिव्या पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचे बुकींगही सुरु केले आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यात सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तसेच मनसे देखील ही सेवा देऊ केली आहे.त्यामुळे या पदाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागण्यास सुरवात केली आहे. परंतु मोफत सेवा हवी असल्यास आधी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवा मगच मोफत सेवेचा लाभ दिला जाईल असे सांगितले जात आहे. हे पुरावे सादर केल्यानंतर त्या चारकमान्याची माहिती ही या राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडे आपसुक जमा होत आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका किंवा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तुम्हाला आम्ही मोफत सेवा देतो, मग आम्हाला आमच्या नेत्याला मत द्या असे देखील सांगितले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हे पुरावे घेतले जात असावेत अशी चर्चा सुरु आहे.