लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली उद्याने तसेच मैदाने रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा नुकतीच सरकारने दिली, परंतु तेथे वावरताना कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आणि प्रामुख्याने मास्क घालण्याचे बंधनदेखील घातले आहे. सरकारच्या या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन मुंब्र्यातील कौसा भागातील घासवाला कंपाैंडमध्ये नुकत्याच सुरु केलेल्या स्वर्गीय मौलाना साहेब अहमद खान या एकमेव उद्यानात पालक तसेच त्यांच्या मुलांचा विनामास्क मुक्तपणे वावर सुरु असतो. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. असे असतानाही येथील उद्यानात तसेच शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्त्यांवर अपवादात्मक व्यक्ती वगळता येथील वयस्करांबरोबरच मुलेदेखील बिनदिक्कतपणे विनामास्क वावरताना आढळतात.
या उद्यानात मोजकीच खेळणी असून, त्यावर खेळण्यासाठी मुलांची चढाओढ सुरु असते. ज्या भागात खेळणी बसवण्यात आली आहेत ती जागा अतिशय कमी असल्यामुळे तेथे वावरताना मुलांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता येत नाहीत. खेळणी बसवलेल्या ठिकाणी जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी येथे कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाचे पाणी घसरगुंडीच्या खालच्या बाजूला साचले असून, पाण्याच्या डबक्यात निरागस मुले खेळतात. यामुळे त्यांचे आरोग्य बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हिरवळीवरदेखील चिखल झाला आहे. हे उद्यान जेव्हा सुरु झाले तेव्हा तेथे प्रवेशासाठी मास्कची सक्ती करण्यात येत होती, परंतु सध्या येथे विनामास्क प्रवेश देण्यात येत आहे. याबाबत येथील सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली असता कोरोना नसल्याचे सांगून उद्यानात येणारे पालक तसेच मुले मास्क वापरण्याकडे कानाडोळा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे येथे येणाऱ्यांना मास्क घाला म्हणून सांगणाऱ्या दोन्ही सुरक्षा रक्षकांनी स्वत:च मास्क घातला नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीच्या निदर्शनास आले.