अंबरनाथ: अंबरनाथच्या के टी स्टील या कंपनीच्या परिसरात लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी दोन गटात तुफान हाणाभारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारी प्रकरणात आरोपींच्या विरोधात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कंपनीत काम मिळवण्यासाठी सुरू असलेली दबंगगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अंबरनाथ शहरात अनेक कारखान्यांमध्ये कामे मिळवण्यासाठी दोन गटातील वाढती स्पर्धा जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असाच काहीसा प्रकार अंबरनाथच्या पश्चिम भागात असलेल्या के टी स्टील या कंपनीच्या आवारात नव्याने तयार करण्यात आलेल्या कारखान्याच्या परिसरात घडला आहे. फिर्यादी ऋतिक गालफाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ऋतिक आणि त्याचा सहकारी निजामुद्दीन शेख हे दोघे प्रियान फूड कंपनीचे लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी कंपनीत गेले होते. त्याचवेळी आरोपी मोनू बिष्टे राकेश बिष्टे, बालाजी, विजय आणि इतर चार ते पाच अनोळखी इसम त्याच कंपनीच्या परिसरात काम घेण्यासाठी आले होते.
हे काम मिळवण्याच्या वादात दोन्ही गटात हाणामारीची घटना घडली. यावेळी दोन्ही गटाचे गुंड एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हा प्रकार घडत असताना एक इनोव्हा कार देखील अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही ईनोवा कार अंगावर येताच दुसऱ्या गटाच्या काही तरुणांनी त्या गाडीवर दगडफेक केली. हा सर्व प्रकार या कंपनीच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दोन गटातील हाणामारी थोडक्यात निभावली असली तरी कंपनीत कामे मिळवण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कंपन्यांमध्ये काम मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असल्याने या राजकीय हस्तक्षेपामुळे काही गाव गुंड देखील उघडपणे दबंगगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे या गावगुंडांवर लगाम लावण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.