लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : आरटीओ कॅम्पमध्ये गुरुवारी ड्रायव्हिंग लायसन्स काढून देणाऱ्या दोन एजंटमध्ये रांग लावण्यावरून तुफान हाणामारी झाली. परस्परांच्या उरावर बसलेल्या या दोन एजंटांच्या फ्री स्टाइलमुळे लायसन्स काढायला आलेल्यांची करमणूक झाली. मात्र, कालांतराने एकाच डबक्यात राहायचे तर वैरभाव पत्करून चालणार नाही, याची जाणीव झाल्याने की, आरटीओ अधिकाऱ्यांनी करून दिल्याने उभयतांनी मांडवली केली.चाविंद्रा, हॉटेल ग्रीनलॅण्ड येथील आरटीओ कॅम्पमध्ये अबू हमजा फकरे आलम आणि रिजवान सादिक मोमीन या दोन एजंटमध्ये आपापल्या ग्राहकांच्या परवान्यांकरिता रांग लावण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेने काही काळ कॅम्पमध्ये तणाव निर्माण झाला होता.नाशिक रोडवरील हॉटेल ग्रीनलॅण्डमध्ये प्रत्येक बुधवार ते शुक्रवार आरटीओ कॅम्प भरत असतो. या कॅम्पमध्ये शेकडो एजंट आरटीओकडील दलालीची कामे करत असतात. वाहनांचे परवाने आॅनलाइन देण्याची व्यवस्था केल्याचे परिवहन विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात आरटीओ कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट तसूभरही कमी झालेला नाही, याची प्रचीती दोन दलालांच्या मारामारीमुळे आली.अबू हमजा फकरे आलम याने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार रिजवान सादिक मोमीन (५६) याने पोलीस ठाण्यात केली. मात्र, आरटीओ कॅम्पमध्ये दोन दलालांत हाणामारी झाल्याची तक्रार पोलिसांनी स्वीकारून कारवाई करणे म्हणजे दलालांचा आरटीओच्या कामातील हस्तक्षेप अप्रत्यक्ष मान्य करण्यासारखा आहे, याची जाणीव आरटीओ अधिकाऱ्यांना झाल्याने त्यांनी या दोन्ही दलालांना तंबी देत तक्रार मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या मोमीन याने पोलीस ठाण्यात जाऊन काही वेळात तक्रार मागे घेत समझोता केला. त्यानंतर, घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोहोचले व त्यांनी वातावरण निवळल्याची खातरजमा केली. मात्र, या कॅम्पमध्ये आता पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भिवंडीत आरटीओ एजंटमध्ये ‘फ्री स्टाइल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:34 AM