लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : फेसबुकवर मैत्रीचे नाटक करत भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली ३० लाख ४३ हजारांची फसवणूक करणाऱ्या परदेशातील लिओनार्ड रोलॅण्ड आणि दिल्लीतील अनिता शर्मा या दोघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोलबाड भागात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला लंडन येथील लिओनार्ड रोलॅण्ड याने फेसबुकद्वारे मैत्रीची आॅफर केली. त्याचा प्रोफाइल चांगला वाटल्याने तिनेही त्याच्याशी मैत्री केली. आॅगस्ट २०१६ पासून त्याने तिला दागिने आणि पाउंड (परदेशी चलन) या स्वरूपात भेटवस्तू पाठवणार असल्याची बतावणी केली. परंतु, या भेटवस्तू मिळवण्यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याची फी तसेच अन्य खर्च लागेल, असे सांगत त्याने तिच्याकडून ३० मार्च २०१७ ते २५ मे २०१७ या कालावधीत तब्बल ३० लाख ४३ हजार ८८ रुपये उकळले. आपल्याला महागडे दागिने आणि परदेशी चलन मिळेल, या भाबड्या आशेपोटी तिनेही तो सांगेल, त्याप्रमाणे एका ठरावीक बँक खात्यात ते पैसे भरले. त्यानंतर, दिल्लीतील एका लॉजिस्टिक कंपनीत पार्सल आल्याचेही अनिता शर्मा हिने तिला सांगितले. परंतु, तिला कोणतेही पार्सल किंवा भेटवस्तू अथवा पैसेही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी २५ मे रोजी गुन्हा दाखल केला.
फेसबुकवरील मैत्रीतून फसवणूक
By admin | Published: May 27, 2017 2:13 AM