अंबरनाथ : महसूल विभागाच्या जाचक अटींच्या विरोधात कुळगाव-बदलापूर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील मटेरियल सप्लायचे काम बंद केले आहे. शुक्रवारी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांवर विचार करण्याची मागणी करण्यात आली. या बंदमुळे तालुक्यात रेती, खडी आणि विटांच्या पुरवठ्यावर त्याचा विपरित परिणाम झाला. या मागण्यांंचा विचार न केल्यास भविष्यात बेमुदत बंदचा इशारा संघटनेचे प्रमुख महेश जाधव यांनी दिला आहे.
अंबरनाथ-बदलापूर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने ४ ते ६ आॅक्टोबरपर्यंत व्यवसाय बंद करून महसूल विभागाच्या जाचक अटींचा निषेध करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील तब्बल दोनशेहून अधिक मटेरियल सप्लायर्स हे या त्रासाचा सामना करत आहेत. बांधकाम साहित्यपुरवठा करणे, हा गुन्हा नाही.नियमानुसार काम करूनही सरकारी यंत्रणेचा त्रास सहन करण्याची वेळ आली. तहसीलदार जयराज देशमुख यांना दिलेल्या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात एका ब्राससाठी रॉयल्टी सुरू करणे, वाढलेल्या रॉयल्टीचे दर कमी करणे, जाचक दंडस्वरूपात आकारली जाणारी अवास्तव रक्कम कमी करणे आणि जागेवर दंड करून गाडी सोडणे, या मागण्यांचा समावेश आहे. बांधकाम साहित्यपुरवठा करणाऱ्यांकडून सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात तडजोड करत आहे. या तडजोडीमुळे मोठा भुर्दंड या व्यवसायावर पडत आहे. बांधकाम करताना आवश्यक असलेले बांधकाम साहित्य पुरवणे हा व्यवसाय एकेकाळी प्रतिष्ठेचा समजला जात होता. आज या व्यवसायाला चोरीचा व्यवसाय केला गेला आहे. त्यामुळे व्यवसाय करणाºयांची प्रतिष्ठाही संपुष्टात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.या व्यवसायाला पूर्वीची प्रतिष्ठा देण्यासाठी या व्यवसायावर लादण्यात आलेल्या जाचक अटी कमी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. मोर्चात सदाशिव पाटील, राजू वाळेकर, बाळाराम कांबरी, महेश जाधव आदी सहभागी झाले होते.