अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून तर सेनेने स्वतंत्ररित्या २७ गावांंमधून फॉर्म भरल्याने अखेर ही निवडणूक सर्वच्या सर्व १२२ जागांसाठी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सेना-भाजपातच बिग फाइट होणार असल्याचे चित्र आहे.युती संदर्भातील सर्व चर्चा फोल ठरल्याने शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले, तर भाजपानेही कल्याणमध्ये तसेच काहींच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले. त्यामुळे कल्याणसह डोंबिवलीतील फॉर्म स्वीकारण्याच्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागातील २७ गावांमधून येणाऱ्या अर्जदारांसाठी रॅपीड अॅक्शन फोर्ससह अन्य सुरक्षायंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यात केला होता. सर्वच ठिकाणच्या अर्ज स्वीकारण्याच्या केंद्रांवर सेना-भाजपाचे उमेदवार आले की, त्यांचे समर्थक मोठ्याने घोषणा देत होते, त्यामुळे काही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणेवरचा ताण वाढला होता. अखेरीस दुपारी अत्यंत शांततेच्या वातावरणात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पार पडली. युती नाही असे समजूनच दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस अधिक तणावाचे असतील. विशेषत: जेथे सेना-भाजपाचे उमेदवारांचे तुल्यबळ समसमान आहे तेथे विशेष वॉच ठेवावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने खासगी फौज उभी करण्यासाठी व्यायाम शाळेच्या युवकांना तर सेनेच्या वतीने नाशिकमधील काहींना येथे बोलावले आहे. त्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आघाडीमध्येही सध्या तरी उत्साहाचे वातावरण असून सेना-भाजपाच्या भांडणाचा लाभ कसा उठवता येइल, याकडे मनसेचे लक्ष आहे. त्यातच २७ गावांमधील संघर्ष समिती यापुढे नेमके काय पाऊल उचलते हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसला कान्होजी जेधे मैदान, गावदेवी, इंदितानगर, आयरेरोड, दत्तनगर या भागातून अपेक्षा आहेत. शिवसेनेचे पश्चिमेला मोठागाव-ठाकुर्ली, आनंदनहर, महाराष्ट्रनगर, कोपर रोड, सखाराम कॉम्प्लेक्स यासह पूर्वेला संगितावाडी, दत्तनगर, सारस्वत कॉलनी, आदी भागात अपेक्षा आहेत. अशाच पद्धतीने कल्याण पूर्वेत आणि पश्चिमेतही प्रत्येक पक्षांचे पॉकेट असून तेथून संबंधितांचे उमेदवार निवडून येतील असा दावा करण्यात येत आहे.कल्याण ग्रामीणमध्ये नेमके कोण बाजी मारते त्यावरच पक्षाचा महापौर कोण असू शकतो हे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेने तेथून सर्व जागांवर फॉर्म भरल्याने अन्य पक्षांनीही फॉर्म भरले. आघाडीने मात्र संघर्ष समितीवर निर्णय सोपवल्याने त्या पक्षाकडून तेथून अर्ज भरले की नाही हे स्पष्ट नाही.
आघाडीला चिंता अस्तित्वाची
By admin | Published: October 14, 2015 2:43 AM