ठाणे : पावसाळा सुरू झाला तरी रेनकोट, चपला, गणवेष नाही, किमान वेतन अधिसूचनेनुसार वेतन नाही, पाठपुराव्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.ठाणे पालिकेच्या घंटागाडी, रस्ते सफाई करणाºया ३ हजार पेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. हेच कर्मचारी शहरातील रस्ते सफाई आणि घंटागाडीवर चालक म्हणून काम करतात. ते युनियनच्या माध्यमातून किमान वेतन अधिसूचनेनुसार वेतन मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. २४ फेब्रुवारी २०१५ पासून किमान वेतन लागू झाला. मात्र, अद्यापर्यंत ते देण्यात आलेले नाही, पावसाळा आला तरीही रेनकोट, चपला आणि गणवेश देण्यात आलेले नाहीत.प्रलंबित मागण्यांवर आठवड्यात निर्णय घेण्यात न आल्यास २० जून रोजी सफाई कर्मचारी आणि घंटागाडी वाहनचालक यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची सूचना निवेदनाने प्रशासनाला आणि महापौर यांना देण्यात आली होती, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
घंटागाडी कर्मचाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:01 AM