ठाणे : वृत्तपत्रविक्रेते कोणताही ऋतू असेल किंवा काही संकट आले, तरी आपली वृत्तपत्रवाटपाची अविरत सेवा सतत देत आलेले आहे. आताही या कोरोनाच्या संकटकाळी 'ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशन'च्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच वृत्तपत्रविक्रेते या कालावधीतील गरज लक्षात घेऊन ताजा भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या १० विक्रेत्यांनी ही सेवा सुरू केली असून त्यांच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
वृत्तपत्रविक्रेत्यांची परिस्थिती तशी बेताचीच असते. पण, सामाजिक सहकार्यासाठी स्वत:हून पुढे येण्याची त्यांची ही श्रीमंती वाखाणण्याजोगी आहे. सध्याच्या या सामाजिक गरजेच्या दृष्टीने वृत्तपत्रवाटपाच्या सेवेला जोडून येथील विक्रेत्यांनी भाजीपाला, फळे आणि घरगुती किराणा ठाणेकर जनतेला घरपोच देण्याचा चंग बांधला आहे.
वर्षभर वृत्तपत्रविक्रेता घरपोच सेवा देत असतो. त्याच्या या सेवेला जोडून ठाणेकरांची भाजीपाला, किराणा घरपोच करण्याची सेवा त्यांच्याकडून ठाण्यातील गगनचुंबी इमारती, बैठ्या चाळी आदी नागरी वस्त्यांत केली जाणार आहे. सध्या ठाण्यामध्ये १० वृत्तपत्रविक्रेते या सेवेसाठी तैनात आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी सांगितले.- गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Greenfield agro services अॅप डाऊनलोड करुन, आॅर्डर बुक करताच पुढच्या दोन दिवसांत वृत्तपत्रविक्रेता ही आॅर्डर आपल्याला घरपोच आणून देणार आहे.