- समीर नातूप्रख्यात बिल्डर जुन्या, धोकादायक, अतिधोकादायक या इमारतींचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी बहुस्तरीय उपाययोजना करावी लागेल. या इमारतींचे आयुष्य ३० किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे झाली आहे. त्यातल्या बऱ्याचशा लोडबेअरिंग तंत्राने बांधलेल्या आहेत. त्यामुळे तीन प्रश्न निर्माण होतात. या इमारती पाडून बांधायच्या कोणी, नवीन इमारत बांधून होईपर्यंत इमारतीतील रहिवाशांनी राहायचे कुठे व रहिवाशांना नवीन घरे देण्याचा खर्च सोसायचा कोणी? हे प्रश्न आधी सोडवावे लागतील. मुंबईमध्ये जसे इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळ आहे तशी यंत्रणा ठाणे आणि अन्य जिल्ह्यात साकारावी लागेल. आता नव्या इमारती बांधायच्या कोणी, या प्रश्नाचे उत्तर या इमारती ज्या भूखंडावर आहेत ते भूखंड विकासकाला जादा एफएसआयसह देऊन मिळविता येईल. म्हणजे या बिल्डरने असा भूखंड घेऊन त्यावर इमारती बांधायच्या़ त्यात मूळ रहिवाशांना मोफत अथवा काही रक्कम घेऊन घरे देऊन उर्वरित खर्च वाढीव एफएसआयमधून साकारलेल्या बांधकामाच्या विक्रीतून वसूल करायचा, असे करता येईल. मुळात इमारत लोडबेअरिंगची. रहिवासी पागडी पद्धतीने दशकानुदशके राहणारे, अशा स्थितीत इमारतीची देखभाल करणे इमारतींच्या मालकांना शक्य नाही. दिवसेंदिवस पागडी पद्धत मागे पडते हे चांगले आहे. पण सोसायटी सदस्यांत असणाऱ्या पराकोटीच्या मतभेदामुळेही नव्या इमारतींची देखभाल दुर्लक्षिली जाते आहे. हे चित्रही बदलणे गरजेचे आहे.
एफएसआय वाढ, पुनर्बांधणी मंडळ पाहिजे
By admin | Published: August 09, 2015 1:59 AM