भिवंडी- भिवंडीतील काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची १४ फेब्रुवारी २०१७ रोजी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी फिर्यादी प्रदिप मनोहर म्हात्रे ( रा.कालवार ) यांनी फिर्याद दिली असता त्यांच्या फिर्यादीवरून या हत्ये प्रकरणी मनोज म्हात्रे यांच्याच कुटुंबातील आरोपी प्रशांत म्हात्रे यांच्यासह अनेकांना नारपोली पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी फरार आरोपींचा नारपोली पोलीस शोध घेत असतांनाच या प्रकरणातील आणखी एका आरोपीस नारपोली पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
सुशांत भास्कर म्हात्रे ( वय २८ वर्षे, रा. कालवार ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हत्या झाल्या पासून सुमारे पाच वर्षांपासून फरार होता. आरोपी सुशांतचा शोध नारपोली पोलीस घेत असतांनाच तो भिवंडी – वसईरोड येथील नारपोली तलावाजवळ येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन त्यास मोठ्या शिताफीने नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाला असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.
फरार आरोपीस अटक करण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक चेतन पाटील, पोलीस उप निरीक्षक रोहन एल शेलार, पोहवा बोडके, पोलीस हवालदार नवले, पोना सहारे, पोना शिंदे, पोलीस शिपाई क्षिरसागर, पोशि सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.