ठाणे : पश्चिम बंगाल येथील परगणा येथील एका पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून फरार झालेल्या आरोपीच्या ठाणे गुन्हे शाखा घटक-१ ने अंबरनाथ येथून मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीच्या अटकेसाठी पश्चिम बंगाल सीआयडीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे मदतीची विनंती केली होती.
मोहम्मद बिलाल मोहम्मद मनिक मुल्ला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगाल येथील परगणा येथील बसंती पोलीस स्टेशन एका पाचवर्षीय मुलाला अपहरण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सीआयडी पश्चिम बंगाल यांच्यामार्फत करण्यात येत आहे. याच दरम्यान, आरोपी मोहम्मद बिलाल मोहम्मद मनिक मुल्ला हा स्वतःचे अस्तित्व लपवून ठाणे येथे राहत असल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पश्चिम बंगालचे पोलीस महानिरीक्षकांनी त्यांच्याकडील एक पथक ठाणे येथे पाठवून ठाणे पोलीस आयुक्तांकडे आरोपीच्या तपासकामात मदतीची मागणी केली. त्यावेळी पोलीस उपआयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी पश्चिम बंगालची टीम व गुन्हे शाखा, घटक १ चे सपोनि संदीप चव्हाण, पोहवा आशीष ठाकूर, पोना संजय बाबर, पोशि भगवान हिवरे असे तपास पथक तयार केले. त्यावेळी सदरचा आरोपी अंबरनाथ भागात असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने सापळा रचून मोहम्मद बिलाल मोहम्मद मनिक मुल्ला याला अंबरनाथ येथील भालगाव, नेवाळी येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.