कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात विकासकामे चांगल्या पध्दतीने सुरू आहेत. शिवसेनेने जी वचने मागील निवडणुकीच्या वेळी दिली होती त्याची पूर्तता होत असल्याचा दावा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रविवारी ते काळातलाव येथील म्युझिक सिस्टीम व ओपन जिमचा शुभारंभ तसेच कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी तलावातील रंगीत कारंजाचे लोकार्पण करण्यासाठी आले त्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर कल्याणी पाटील, सभागृहनेते कैलास शिंदे, गटनेते रविंद्र पाटील, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, भाऊसाहेब चौधरी, केडीएमसीचे अतिरिक्तआयुक्त संजय घरत, शहरअभियंता पी.के उगले आदि मान्यवर उपस्थित होते. ठाकरे यांनी यावेळी दुर्गाडी किल्ला परिसरातील गणेशघाटावर केल्या जाणा-या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. यानंतर त्यांनी म्युझिक सिस्टीम आणि ओपन जिमला भेट देऊन त्याचे लोकार्पण केले. अशा जिम सर्वत्र होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेना जी वचने देते ती पूर्ण केली जातातच त्यांच्याच उदघाटनांसाठी आलो आहे. मी या परिसराचा वारंवार दौरा करीत असून येथील विकासकामे चांगल्या पध्दतीने पूर्ण होत असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी कोणत्याही वादग्रस्त विषयांवर भाष्य करण्याचे कटाक्षाने टाळले. (प्रतिनिधी)
वचनपूर्तीची कामे पूर्ण होत आहेत; आदित्य ठाकरेंचा दावा
By admin | Published: August 30, 2015 11:28 PM