भिवंडी : भिवंडीतील २०० बेडच्या माता व बालसंगोपन विभागाच्या रुग्णालयासाठी नवी इमारत तसेच भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर, अनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिरोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांवरून इमारतींच्या कामांसाठी यंदा १२ कोटी ५९ लाख ५० हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून गुरुवारी देण्यात आली आहे.
शहर व ग्रामीण भागात लोकसंख्या वाढत असून, इंदिरा गांधी स्मृती हॉस्पिटलवर ताण येत आहे. त्याचबरोबर महिला व मुलांवर उपचार करण्यासाठी भिवंडीत उपविभागीय रुग्णालयाच्या दर्जाचे २०० बेडचे रुग्णालय उभारण्याची विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर, अनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिरोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने २०० बेडचे रुग्णालय आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीला मान्यता दिली होती.
आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत माता-बाल रुग्णालय आणि तीन आरोग्य केंद्र-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आराखडा मंजूर केला आहे. भिवंडीतील माता-बाल रुग्णालयाच्या इमारतीसाठी ५८ कोटी खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दिवे-अंजूर व आनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचाऱ्यांच्या १२ निवासस्थानांसाठी प्रत्येकी ६ कोटी २२ लाखांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार दोन्ही केंद्रांच्या इमारतीसाठी प्रत्येकी ३ कोटी ११ लाख, तर दोन कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या शिरोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व १० कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या निविदा लवकरच काढल्या जाणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.