भिवंडी - जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील २४ गावांमध्ये सुरू असलेल्या पाणी योजनेचा समावेश करून स्टेम कंपनीला योजनेच्या नुतनीकरणासाठी अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
भिवंडी तालुक्यातील २४ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मे १९८७ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. कालांतराने ती स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे वर्ग करण्यात आली. या योजनेला आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला असून, वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा कमी होत आहे. त्याचबरोबर माणकोली ते खारबाव, काटई, कांबे, शेलार, बोरपाडा, सुरई, भरोडी, काल्हेर परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जुनी झाली आहे. या जलवाहिनीच्या कामाचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ४९.५० किलोमीटर जलवाहिनी टाकण्यासाठी ६३ कोटी ८७ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामानंतर २४ गावांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रति माणसी प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा शक्य होईल, असे स्टेम कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे म्हणणे असल्याने मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील २४ गावांमध्ये अंतर्गत जलवाहिनीची कामे सुरू आहेत. मात्र, मुख्य वाहिनीच्या कामासाठी जल जीवन जीवन मिशनच्या माध्यमातून निधीची आवश्यकता आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.