उल्हासनगर : एलबीटीच्या सर्वोच्च उत्पन्नावर नव्हे तर जकातीच्या सर्वोच्च उत्पन्नावर निधी देण्याची मागणी महापालिका शासनकडे करणार आहे. एलबीटीच्या उत्पन्नानुसार तो दिल्यास पालिकेचे वर्षाला १०० कोटींचे नुकसान होऊन शहर विकासाची कामे ठप्प होणार असल्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत जकातीऐवजी एलबीटी स्थानिक करप्रणाली लागू झाल्यानंतर जकातीपेक्षा जास्त उत्पन्नाची आशा तत्कालीन आयुक्तासह स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली होती. परंतु, प्रत्यक्षात जकातीहून निम्म्यापेक्षाही कमी उत्पन्न एलबीटीपासून मिळाल्याने गेल्या दोन वर्षांत पालिकेला २०० कोटींचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम शहर विकासावर होऊन प्रशासन मूलभूत सुखसुविधा देण्यास असमर्थ ठरले आहे. महापालिकेचे जकात/एलबीटी व मालमत्ता-पाणीपट्टीकर मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. यापैकी एलबीटीच्या उत्पन्नाने नीचांक गाठल्याने शहर विकास कामे गेल्या दोन वर्षांपासून ठप्प पडली आहेत. पालिकेला जकातीपासून दरमहा १६ तर वर्षाला १८० कोटींचे उत्पन्न मिळत होते. तर, एलबीटीपासून दरमहा ८ कोटी तर वर्षाला १०५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
जकातीच्या उत्पन्नावर निधी द्या! उल्हासनगर पालिकेची मागणी
By admin | Published: August 01, 2015 11:40 PM