कुमार बडदे।मुंब्रा : कॅन्सरमुळे निधन झालेल्या दानिश विल्सन यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाचे कारण पुढे करून नकार दिल्यामुळे मुस्लिमांनी पुढाकार घेऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. विल्सन मागील ३७ वर्षांपासून ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील करवालोनगरमधील साबिया मंझिलमध्ये राहत होते. त्यांना तोंड व फुप्फुसाचा कर्करोग झाला होता. त्यामुळेच रविवारी त्यांचे निधन झाले.
याबाबत केरळमध्ये राहत असलेली त्यांची आई, भाऊ, बहीण यांना माहिती देऊन, अंत्याविधीसाठी त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. परंतु, त्यांनी कोरोनामुळे आम्ही येऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला फक्त मृतदेहाचा फोटो दाखवा आणि अंत्यसंस्कार करून घ्या, असे त्यांनी सांगितले.त्यामुळे त्यांच्या या निरोपानंतर स्थानिकांना याबाबतची माहिती देण्यात आली. मात्र, अंत्यसंस्कारासाठी कुणीच पुढे येत नसल्याचे बघून समाजसेवक निजाम शेख यांनी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह पुढाकार घेऊन अंतिम संस्काराची जबाबदारी घेतली....जपली माणुसकीच्अंत्ययात्रेदरम्यान समाजसेवक निजाम शेख यांनी स्वत: मडके घेऊन स्मशानभूमीमध्ये हिंदू रितीरिवाजाप्रमाणे मुखाग्नीही दिला. जात-धर्म विसरून केवळ माणुसकीच्या नात्याने अंत्यविधी केल्याची माहिती शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.