सुरेश काटेतलासरी :
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावे लागते.
मृत्यूनंतरची ही परवड थांबण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे. तलासरीतील कोचाई-बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बोरमाळ गावातील भेंडीपाडा, पारसपाडा या गावपाड्यात सुमारे सहाशे ते साडेसहाशे लोकवस्ती आहे. दोन्ही पाड्यांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे भरपावसात उघड्यावर अंत्यविधीची वेळ आली आहे. प्रशासनाने मात्र डोळ्याला झापडे लावली आहेत. मागू भाना धोंडी यांचा २० ऑगस्टला मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाइकांना उपलाट बोरमाळ आणि उपलाट या गावांतील नदीत उतरून जावे लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य २० किलोमीटर फेरा मारून न्यावे लागत आहे.
रस्ता आहे, पण पूल नाहीविशेष म्हणजे बोरमाळ भेंडीपाडा येथील नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार आहे, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला उपलाट जाबीपाडा ते नदीपर्यंत डांबरी रस्ता आहे. या नदीच्या दोन्ही बाजूला सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी डांबरी रस्ता झाला, मात्र नदीपात्रात पूल बांधला नाही.