टिटवाळा : स्मशानभूमी बांधण्यासाठी आलेला निधी जागेअभावी चार वेळा परत गेल्यामुळे कल्याण तालुक्यातील रायते, वावेघर आणि नवगाव येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेत. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची अवस्था बिकट होत आहे. तिन्ही गावांसाठी स्मशानभूमी बांधण्याचा लाखोंचा निधी आला होता. मात्र, ग्रामस्थांमधील मतभेदांमुळे त्यासाठी जागाच उपलब्ध न झाल्यामुळे तो चारवेळा परत पाठवण्याची नामुश्की ओढवली.रायते या गावातील पोलीस पाटील स्वप्नील पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उल्हास नदीच्या तीरावर रायते पुलाच्या बाजूला उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. कल्याण-मुरबाड महामार्गाच्या शेजारी आणि उल्हास नदीच्या काठावर रायते हे गाव आहे. तर कल्याण-कसारा रेल्वे मार्गालगत खंडवली ग्रामपंचायत हद्दीतील वावेघर हे गाव आहे. नवगाव हे बापसाई ग्रामपंचायत हद्दीत येते. स्मशानभूमीसाठी जागाच मिळत नाही. सरकारी भूखंडावर स्मशानभूमी बांधायला घेतली तर ग्रामस्थच हरकती घेतात. आता कायदेशीर मार्गाने शासनाकडे जागा मागितली आहे.हे काम शेवटच्या टप्प्यात असून दोन-तीन महिन्यांपासून फाइल पंचायत समितीत अडकली असल्याचे रायतेचे सरपंच पद्मश्री जाधव यांनी सांगितले.कल्याण तालुक्यातील रायते, वावेघर आणि नवगाव या तिन्ही गावांतील स्मशानभूमीसाठी शासनाकडून प्रत्येकी २० लाख रु पये निधी मंजूर करून दिला. मात्र, ग्रामस्थ जागा उपलब्ध करून देत नसल्याने हा निधी चार वेळा परत गेला आहे.- किसन कथोरे, आमदार
उघड्यावरच होतात अंत्यसंस्कार; रायते, वावेघरच्या ग्रामस्थांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:53 AM