ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात गुरूवारी झालेल्या त्वचा रोग तपासणी शिबीरात ९५ मनोरुग्णांना बुरशी आणि खरुज आजार असल्याचे आढळून आले. अस्वच्छतेअभावी हे आजार झाल्याचे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले. या मनोरुग्णांना काही दिवस इतर मनोरुग्णांपेक्षा वेगळे ठेवले जाणार आहे. थोडक्यात त्यांचे तात्पुरत्या स्वरुपाचे विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. या मनोरुग्णां च्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना डॉ. मुळीक यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट वेनरोलॉजिस्ट आणि कुष्ठरोगतज्ञ यांच्यावतीने गुरूवारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात त्वचेच्या आजाराची लक्षणे असलेल्या ९५ मनोरुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ३१ महिला तर ६४ पुरूष मनोरुग्णांचा समावेश होता. या तपासणीत त्यांना प्रामुख्याने बुरशीजन्य आणि खरुज हे दोन आजार असल्याचे आढळून आले. हे ९५ मनोरुग्ण मनोरुग्णालयात उपाचारासाठी दाखल झालेले रुग्ण आहेत. दाखल होण्याआधी अनेक मनोरुग्ण हे भरकटलेले असतात, रस्त्यात इतरत्र पडलेले असल्याचे आढळून येतात. त्यामुळे देखील हे आजार त्यांना होतात.
स्वत:ची स्वच्छता न ठेवणे, ओले कपडे घालणे, घाम आलेले कपडे पुन्हा पुन्हा घालणे ही देखील या आजारामागची कारणे आहेत. तसेच, हे आजार संसर्गजन्य असल्याने ती एकामुळे दुसऱ्याला होत जात असल्याने तो आजार पसरत जातो. अशी ९५ मनोरुग्ण या आजाराची असल्याचे डॉ. मुळीक यांनी सांगितले. या मनोरुग्णांची ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने विशेष काळजी घेतली जाणार आहे. या असोसिएशनच्यावतीने आज या मनोरुग्णांना आरोग्याचे शिक्षण देखील देण्यात आले. यावेळी डॉ. गायत्री भारद्वाज, डॉ. दिव्याल गाला, डॉ. अश्वीनी पाटील, डॉ. पूजा भारद्वाज आदी उपस्थित होते.