पंकज पाटील, अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली बंद असल्याने स्थानिक तरुणाने मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी मॅनेजरने हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
मलंगगड परिसरात राहणारा प्रतीक भोलानाथ पाटील हा तरुण शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता मलंगगड फ्युनिक्युलर ट्रॉलीजवळ आला आणि ट्रॉली बंद असल्याचे पाहून त्याने ऑफिसमध्ये जात प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभ्रता दास यांना ट्रॉली बंद असल्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावर दास यांनी ६ वाजतापासून टेक्निकल फॉल्ट झाल्याने ट्रॉली बंद असून ९ वाजता सुरू होईल, अशी माहिती दिली. त्यावरून प्रतीक पाटील याने दास यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभ्रता दास यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. -