डोंबिवली : राज्यातील ग्रामीण भागाबरोबर शहरालाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. मात्र, राज्यातील दातृत्वाने दुष्काळग्रस्तांना तारण्याचे काम काही प्रमाणात केले आहे. दुष्काळग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले आहेत, असे जलअभ्यासक डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. श्री गणेश मंदिर संस्थानने दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचे आवाहन केले होते. त्याला डोंबिवलीकरांनी प्रतिसाद देत ११ लाख रुपयांचा निधी दिला. तर, मंदिर संस्थानने त्यात सहा लाखांची भर टाकून एकूण १७ लाख रुपये दुष्काळग्रस्तांना दिले. या निधीचा विनियोग दुष्काळग्रस्त भागात कशा प्रकारे केला, त्यातून पाणीटंचाई निवारण्याची कामे कशा प्रकारे केली, बंधारे कसे व किती बांधले, याची माहिती पोळ यांनी शनिवारी सायंकाळी दिली. कार्यक्रमानंतर त्यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी ४० खेड्यांत दुष्काळाचे सावट होते. आता हा आकडा शंभरपेक्षा जास्तीच्या घरात पोहोचला आहे. त्याची झळ शहरी भागालाही लागली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न आहे. आता पाणी न वाचवल्यास, भविष्यात यापेक्षा भीषण परिस्थिती उद्भवेल. दुष्काळग्रस्तांसाठी अमुक एका सरकारने प्रयत्न केले आणि एकाने प्रयत्न केले नाहीत, असे म्हणणे रास्त होणार नाही. सत्तेवर आलेल्या व गेलेल्या सरकारांनी दुष्काळग्रस्तांसाठी प्रयत्न केले. दुष्काळ कमी कसा होईल, हे पाहिले. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, त्याची काळजी स्वत: दुष्काळग्रस्तांनीही घेणे आवश्यक आहे. काही मिळाले नाही, तर त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. महाराष्ट्रातील मदतीच्या हातांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे. दुष्काळाचा प्रश्न अजूनही काही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. ते त्याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास तो ते नक्कीच जाणून घेतील. मदत करणाऱ्या हातांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. दुष्काळ निवारणे, हे केवळ एकट्यादुकट्याचे काम नाही. सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, याकडे पोळ यांनी लक्ष वेधले. दुष्काळग्रस्त गावे व मदत करणाऱ्या संस्था यांच्यात कोणीतरी दुवा असण्याची आवश्यकता आहे. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम होत आहे. मीही ‘नाम’शी जोडला गेलेलो आहे. अभिनेता आमीर खान यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे पाणीटंचाईवर प्रकाश टाकला आहे. आता त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यांची भेट घेतली आहे. मात्र, त्यांच्या भेटीला जात असताना पोळ यांना त्यांच्या परिचित व्यक्तीने प्रश्न विचारला की आपण का तेथे जात आहोत. याचाच अर्थ असा की, अनेकांना पाणीप्रश्न कळलेला नाही. त्यांना नीट माहिती नाही. तसेच पोळ हे नेमके काय काम करतात, याविषयी त्यांना नीट माहिती नाही.
दुष्काळग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील हात मदतीसाठी पुढे
By admin | Published: April 05, 2016 1:18 AM