ठाणे : ठाण्यात गुरुवारी सकाळी खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बसच्या क्लीनरने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात ५४ बसवर कारवाई केली. परंतु, या कारवाईचा फुसका बार संध्याकाळीच फुटला. शुक्रवारी संध्याकाळपासून या बस पुन्हा रस्त्यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या नाकावर टिच्चून धावत होत्या. त्यामुळे या फुसक्या कारवाईमागचे गौडबंगाल काय, अशी चर्चा मात्र शहरभर सुरू झाली आहे. गुरुवारी फ्लॉवर व्हॅली परिसरात घडलेल्या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर, वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच विविध ठिकाणी आपली कुमक ठेवून ठिकठिकाणी खासगी बसच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु, सूर्य मावळला आणि पुन्हा या बस रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली. मात्र, यात तीनहातनाक्याचे बस उभ्या राहण्याचे ठिकाण काहीसे पुढे नेले. त्यानंतर, शनिवारी सकाळीदेखील नितीन कंपनी, कॅडबरी आदी जंक्शनवरून खासगी बस सुटत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या फुसक्या कारवाईमागचे गमक काय, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मागील वेळेसही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. तसेच आरटीओने बस जप्तीचा इशाराही दिला होता. त्यानंतर, काही दिवस बंद राहिलेल्या या बस पुन्हा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली होती. आताही दिवस सरत नाही, तोच पुन्हा बस रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
खासगी बसवरील कारवाईचा फुसका बार
By admin | Published: March 20, 2016 12:51 AM