रिॲलिटी चेक
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण एसटी बसडेपोतून अनलॉकमध्ये बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. बसमध्ये विनामास्क प्रवाशांना प्रवेश दिलाच जात नाही. मात्र, बसमध्ये प्रवाशांना अंतर ठेवून बसविले जात नाही. त्यामुळे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी प्रवासी संख्येवर मर्यादा होती. मात्र, आता दुसरी लाटही ओसरली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. ‘टू बाय टू’च्या बसमध्ये एका सीटवर प्रवासी एकमेकांच्या शेजारी शेजारीच बसत आहेत. केवळ वाहकाच्या सीटवर वाहक एकटेच बसून प्रवास करीत आहे. वाहक आणि चालकांना डेपो प्रशासनाकडून मास्क दिले जात आहेत. मात्र, सॅनिटायझर दिले जात नाही. प्रवाशांनी स्वत: मास्क घालणे सक्तीचे आहे. सॅनिटायझरची व्यवस्था स्वत: प्रवाशांनी करायची आहे. कोरोनाची लाट ओसरली असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रवासात प्रवासी व वाहक, चालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक बस फेरीनंतर बस सॅनिटाइज केली जात आहे. त्या धुतल्यानंतरच फेरीवर पाठविल्या जातात. मात्र, बस डेपो परिसरात अस्वच्छता असून, त्याकडे डेपो प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
--------------------
अर्ध्या तासाच्या प्रवासात किती वेळा तोंडावर मास्क
१. कल्याण बस डेपोतून प्रवासी बस मुरबाडच्या दिशेने सुटली. तेव्हा सगळ्याच प्रवाशांच्या तोंडावर मास्क होता.
२. बस डेपो सोडताच पाच-दहा मिनिटांतच चार प्रवाशांनी त्यांच्या तोंडावरचा मास्क खाली केला. खिडकीची मोकळी हवा घेण्याचा प्रयत्न केला.
३. वाहक आणि चालकाने तोंडावरचा मास्क मुरबाड येईपर्यंत काढलाच नाही.
---------------------
‘लोकमत’चा एसटी प्रवास
बस : कल्याण-मुरबाड
वेळ : दुपारी १२ वाजता
प्रवासी : ४०
---------------------
कुठल्या बस स्थानकावर किती चढले-उतरले
१. प्रेम ऑटो बस स्थानकावर तीन प्रवासी उतरले. चार प्रवासी चढले.
२. म्हारळ बस स्थानकावर दोन चार प्रवासी उतरले. सहा प्रवासी चढले.
३. गोवेली बस स्थानकावर चार प्रवासी उतरले. पाच प्रवासी चढले.
---------------------