ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, कोपरीतीसह दिव्यातील निवारा केंद्राला स्थानिक नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत विरोध केला. स्टेशनजवळ अशा प्रकारचे निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असताना गावात किंवा स्टेशनपासून लांबच्या अंतरावर ते सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले असल्याने या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला.
स्टेशन सोडून इतर ठिकाणी तुम्हाला निवारा केंद्र सुरू करण्याची गरजच काय, असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यानुसार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी हा प्रस्ताव तहकूब केला. त्यामुळे आता रात्रनिवारा केंद्राचे भवितव्य अधांतरी आले आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बेघरांचा सर्व्हे केला होता. त्यात ५२ जणांचा समावेश आहे. परंतु, लोकसंख्येच्या मानाने शहरात १८ निवारा केंद्र असावेत, असे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील गांधीनगर पोखरण रोड नं. २, कोपरी येथील शाळेची धोकादायक इमारत, शिवाईनगर आणि दिवा-म्हातार्डी येथील जागा निश्चित केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, कोपरी गावातील शाळेतील निवारा केंद्राला भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी विरोध केला. या ठिकाणी जुने मंदिर आहे, येथे ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी निवारा केंद्र सुरू करू नका, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच ही शाळा निवडण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती, असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे दिवा स्टेशनपासून म्हातार्डी गाव ४ किमी अंतरावर आहे. असे असताना स्टेशन परिसर सोडून गावात निवारा केंद्र कशासाठी, असा सवाल स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. तर नौपाड्य़ात सुरू असलेल्या केंद्रावर गोरगरीब, भिकारी येत नसून त्या ठिकाणी चांगले व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. त्यातही येथील केंद्र महापालिकेने यापूर्वीच दिली होती. त्या ठिकाणी मॅटर्निटी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याने ते बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी महापालिकेच्या इतर इमारतीदेखील घोडबंदर किंवा शहरापासून दूरच्या भागात उभ्या आहेत. त्या ठिकाणी ही केंद्र हलवा, असा दमच भरला. तसेच विरोध लक्षात घेऊन महापौरांनीदेखील हा प्रस्ताव तहकूब केला.