ठाणे : मागील काही महिन्यांपूर्वी ठाण्यात भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर आता ठाणे शहरात काँग्रेसने भावी पंतप्रधान म्हणून लावलेले बॅनर सर्वांचे लक्षवेध आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा येत्या १९ जून रोजी वाढदिवस आहे. अनोख्या पध्दतीने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात झळकतांना दिसत आहेत. त्या बॅनरवर राहुल गांधींना भावी पंतप्रधान म्हणून संबोधित करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय चचेर्ला उधाण आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्याचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील विविध भागात राष्ट्रवादी असो काँग्रेस या मनसे असो या पक्षातील कार्यकर्त्यांनी आपआपला नेता मुख्यमंत्री व्हावा या उद्देशाने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते. नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच, आता काँग्रेसने पुन्हा एकदा उडी घेतली आहे. देशाचे भावी पंतप्रधान अशी बॅनरबाजी केली आहे. हे बॅनर ठाणे जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेरील सिग्नलवर तसेच मुस रोडवर लावलेले आहेत. या बॅनरमुळे पुन्हा कॉंग्रेस चर्चेत आली आहे. तर हे बॅनर काँग्रेस पक्षातील दिवंगत माजी आमदार क्रांती कोळी समर्थक असलेले ठामपा शिक्षण मंडळ उपसभापती नंदकुमार मोरे यांनी लावलेले आहेत.
त्या बॅनरवर "नफरत छोडो, भारत जोडो" असे उल्लेख असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांचा आवाज, भारताचे संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढलेले काँग्रेस पक्षाचे निर्भिड नेते भावी पंतप्रधान मा. राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हटले आहे. याशिवाय त्या बॅनरवर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आजी अध्यक्ष मल्लिलार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ठाण्यातील स्थानिक काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्ष शिल्पा सोनाने यांचे छायाचित्रे आहेत. काँग्रेसने लावलेल्या भावी पंतप्रधान या बॅनरने ठाण्यात चांगली चर्चा रंगू लागली आहे.
" काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना पक्ष आहे व सर्वाधिक काळ काँग्रेसने देशाचं नेतृत्व केले आहे, राहुल गांधी हे या पक्षाचे नेते आहेत म्हणून या पक्षात भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहणे हे कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोन योग्यच आहे. त्यांनी आपली इच्छा प्रकट करणे यामध्ये चुकते कुठे. सध्या राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे निश्चितच दावेदार आहेत."- सचिन शिंदे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस ठाणे शहर.