ठाणे - डॉ. घाणेकर नाटयगृहाचे छत पडल्याच्या घटनेला दिड वर्ष होत नाही तोच बुधवारी राम गणेश गडकरी रंगायतमधील खालील प्रेक्षागॅलरीचा छताच्या पिओपीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी एका संस्थेचा कार्यक्रम सुरु होता आणि त्याला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. सुदैवाने एका कोपऱ्यातील हा छताचा भाग असल्याने यात एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु आता हे नाटयगृह बंद करण्यात आले असून तांत्रिक अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु पालिकेने ही घटनाच दाबण्याचा प्रयत्न केल्याची बाब मात्र या निमित्ताने समोर आली आहे.मागील दिड वर्षापूर्वी घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील छत पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे नाट्यगृह सुरु होण्यासाठी जास्तीचा काळ लोटला होता. आता तर ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि ठाण्याची पहिली सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिल्या गेलेल्या गडकरी रंगायतनमधीलच खालील बाजूला असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा काही भाग पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. सुदैवाने एका कोपºयातील हा भाग पडल्याने मोठी हानी टळली असली तरी देखील एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण चित्रपट महोत्सवचा आज दुसरा दिवस होता. त्यामुळे या सोहळा पाहण्यासाठी सुमारे ७०० च्या आसपास शालेय विद्यार्थी आले होते. परंतु घटना घडल्यानंतर काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान सकाळी १० च्या आसपास ही घटना घडली आणि घटनेची माहिती मिळताच, व्यवस्थापक आणि आपत्ती विभागाची टीम दाखल झाली. त्यानंतर सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून आजचा सोहळा रद्द करण्यात आला. १९७८ मधील हे नाटयगृह असल्याने आता या नाट्यगृहाबाबत तांत्रिक अहवाल मागविण्यात आला असून तो आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल असे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे गुरवारी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.दरम्यान सकाळी ही घटना घडल्यानंतरही पालिकेने मात्र या घटनेबाबत जराही ब्र काढला नाही. उलट ही घटना दाबण्यासाठीच पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते.
ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या पिओपीचा भाग पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 8:01 PM
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूस असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताच्या पिओपीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी देखील हे नाटयगृह आता तांत्रिक अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
ठळक मुद्देपालिकेने केला घटना दाबण्याचा प्रयत्न७०० विद्यार्थी होते उपस्थितपर्यावरण चित्रपट सोहळ्याच्या वेळी घडली घटना