ठाणे - ठाण्यातील महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही, छत पूर्णपणे काढून दुसरे बसविण्याची गरज आहे का?, आदींसह इतर बाबींचा अभ्यास आता तांत्रिक अहवालाच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु हा अहवाल येण्यास आणखी तीन दिवस जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस तरी तुर्तास गडकरी रंगातयनाचा पडदा उघडला जाणार नाही. त्यामुळे या काळात होणार प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. ठाण्याची पहिली सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिल्या गेलेल्या गडकरी रंगायतनमधीलच खालील बाजूला असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा काही भाग पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाचा पर्यावरण चित्रपट महोत्सव सुरु होता. यावेळी ७०० विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. परंतु आता या किरकोळ घटनेमुळे देखील गडकरी रंगायतनाचा पडदा बंद झाला आहे. १९७५ मध्ये राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या भूमीपूजनाचा नारळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते फोडण्यात आला. तर १५ डिसेंबर १९७८ साली याचे उद्घाटन दिवंगत स्वातंत्र सेनानी दत्ताजी ताम्हाणे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महासागर आणि मृगतूष्ण या दोन नाटकांचे प्रयोग गडकरी रंगायतन येथे झाले होते. त्यानंतर पुन्हा १४ मार्च १९९९ साली या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येऊन त्याचे उदघाटनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान गडकरी रंगायतनची आसन क्षमता ही ९६२ एवढी आहे. रोज येथे नाटकाचे अथवा इतर साधारणपणे चार प्रयोग होत असतात. ठाण्याचा मानबिंदू म्हणूनही गडकरी रंगायतनकडे पाहिले जाते. १९७८ पासून हे नाट्यगृह ठाण्याची शान राखून आहे. परंतु आता ते अधिक धोकादायक होऊ नये आणि पाण्याच्या माऱ्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होऊ नये यासाठी संपूर्ण रंगातयनवरच छत टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार काही महिन्यापूर्वी त्या आशयाचा प्रस्ताव मंजुर झाला असून, सुमारे साडेतीन कोटींचा खर्च यासाठी केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.दुसरीकडे मागील काही दिवसापासून या इमारतीचे आयुर्मान तपासण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडीटचे कामही सुरु झाले होते. परंतु त्या आधीच ही घटना घडली आहे. त्यामुळे आता ते कामही अर्धवट राहिले आहे. परंतु आता येत्या दोन ते तीन दिवसात गडकरी रंगायतनाचा तांत्रिक अहवाल येईल त्यानंतरच पुढील दिशा ठरविली जाईल अशी माहिती नगर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी येथे दोन प्रयोग होते, तर शुक्रवारी देखील एकांकीका स्पर्धा आणि एक नाट्यप्रयोग होता आता तो देखील रद्द करण्यात आला आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतनचा तांत्रिक अहवाल येण्यास लागणार तीन दिवसांचा कालावधी, नाट्यगृह राहणार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 5:25 PM
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याचा तांत्रिक अहवाल येण्यास आणखी तीन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्व प्रयोग रद्द करण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
ठळक मुद्दे१९७८ मध्ये सुरु झाले होते गडकरी रंगायतन९६२ एवढी आहे आसनक्षमता स्ट्रक्चरल आॅडीटचेही सुरु होते काम