कल्याण : ठाण्यातील एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपप्रकरणी भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गायकवाड यांना सहकार्य करणाºया अश्विनी धुमाळ व तिचा पती मनोज धुमाळ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. अश्विनी धुमाळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. तसे बॅनर काही दिवसांपूर्वी शहरात झळकले होते. मात्र, अश्विनी यांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या प्रकरणात हात वर केल्याचे स्पष्ट झाले आहे.गायकवाड यांची ‘फेसबुक’द्वारे त्या तरुणीशी ओळख झाली होती. गायकवाड यांनी माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. याप्रकरणी समझोता करण्यासाठी गायकवाड यांनी धुमाळ दाम्पत्याच्या घरी तरुणीला बोलवून घेतले. मात्र, तेथे धुमाळ यांनी तिला गायकवाड यांच्याकडे एक फ्लॅट व १० लाखांची मागणी करण्यास सांगितले. तसेच तिला गायकवाड यांना फोन करण्यास सांगून ते मोबाइलमध्ये रेकार्ड करून घेतले. त्या आशयाचा मेसेज फेसबुक व मोबाइलवर पाठवण्यास प्रवृत्त केले. पोलिसात तिचे हे बोलणे पुरावा म्हणून वापरले जाईल, असे धमकावून तिला चापटीने मारहाण केली व पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. या सगळ्या प्रकरणात दया गायकवाड यांना अश्विनी व तिचा पती मनोज धुमाळ यांची साथ होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. दया गायकवाड यांनी बलात्काराचा आरोप करणाºया तरुणीविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तसेच गायकवाड यांनी तरुणीचे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.मात्र, अश्विनी धुमाळ यांनी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. बलात्कार प्रकरणात सहकार्य केल्याचा आरोप अश्विनी यांच्यावर झाल्याने राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील यांनी अश्विनी यांचा राष्ट्रवादीशी संबंध नसल्याचा खुलासा करणारे पत्र काढले आहे.यासंदर्भात कल्याण जिल्हा महिलाध्यक्षा सारिका गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अश्विनी यांनी पक्षाच्या मेळाव्यात पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांना पक्षाचे पद देण्याची शिफारस आपण केलेली नव्हती.गेल्या काही दिवसांत भाजपाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींवर असे लैंगिक शोषणाचे आरोप होऊ लागल्याने ठिकठिकाणी आयात नेत्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे.अहवालानंतर योग्य ती कारवाई : दानवेबलात्काराचा आरोप झालेल्या दया गायकवाड यांच्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल भाजपा कल्याण जिल्हाध्यक्षांकडे मागितला आहे. अहवालात गायकवाड दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
गायकवाड बलात्कार प्रकरण : अश्विनी धुमाळचा पक्षाशी संबंध नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने केले हात वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 6:02 AM