ठाणे : कोवीड केअर सेंटरमधून 72 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा मागील दोन दिवसापासून शोध सुरु होता. या संदर्भात मिसिंगची तक्रारही दाखल करण्यात आली होती. परंतु आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाचा मृत्यु झाला असून त्याचा मृतदेह कोपरीतील एका कुटुंबाकडे सोपविण्यात आला होता. त्या कुटुंबाने त्यांचा माणुस समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे जिवंत आहेत. परंतु आता ज्याच्यावर या कुटुंबाने अंत्यसंस्कार केले तो त्यांचा सदस्य नसून ते गायकवाड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोवीड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्ण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला. दरम्यान या संदर्भात ठाणो मतदाता जागरण अभियानच्या वतीने याला जबाबदार म्हणून पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील कोवीड केअर रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टरांशी चर्चा करुन 48 तासात रुग्णाचा शोध लावण्याचे आश्वासन घेतले होते. अखेर रात्री उशिरा या रुग्णाचा शोध लागला खरा मात्र त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. सदर रुग्ण हा सुरवातीला कळवा रुग्णालयात दाखल होता. त्याची प्रकृती खालावल्याने रुग्णालयाने त्यांना महापालिकेच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल केले. तशी माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना देखील देण्यात आली. त्यानुसार त्यांचे कुटुंबिय रुग्णालयात चौकशीसाठी देखील गेले होते. परंतु गायकवाड नावाचा व्यक्ती तेथे नसल्याचे दिसून आले.
त्यानंतर मागील दोन दिवसापासून ठाणो मतदाता जागरण अभियान, भाजप यांच्या माध्यमातून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु त्यांचा काही केल्या शोध लागत नव्हता. अखेर मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यांचा मृतदेह कोपरीतील सोनावणो कुटुंबियाचा सदस्य असल्याचे समजून बंद प्लास्टीकमध्ये देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. परंतु त्यांच्या कुटुंबातील सोनावणो हे जिवंत असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. गायकवाड यांचे तीन दिवसापूर्वीच निधन झाले होते असेही त्यांनी सांगितले. यातून महापालिका प्रशासन नातेवाईकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पारदर्शक बॉडीबॅग न वापरल्यानेच हा भावनांशी खेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु हा गोंधळ कोणी घातला, कोणी त्यांचा मृतदेह कोपरीतील कुटुंबाकडे स्वाधीन केला. हे कोडे असून यात दोषी कोण हे पाहणो महत्वाचे आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून 3 जुलै रोजी सोनावणो यांच्या कुटुंबीयांना फोन करुन सोनावणो यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्यावर या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या अस्थी देखील देण्यात आले. परंतु 7 जुलै रोजीच सांयकाळी सोनावणो यांच्या कुटुंबियांना फोन करुन सांगण्यात आले की सोनावणो हे व्हॅटींलेटरवर असून ते सुस्थितीत आहेत. तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. त्यामुळे झालेल्या या चुकीत कठोरातील कठोर गुन्हा दाखल व्हावा आणि संबधींतावर कारवाई व्हावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे.