राजू ओढेठाणे : सनदी अधिका-याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेने माया गोळा करण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. खंडणीविरोधी पथकाने त्यांच्याकडून माहिती अधिकाराचे तब्बल ६०० अर्ज हस्तगत केले आहेत.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी श्रद्धा आणि सतीशचा मेहुणा अतुल तावडे यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गत महिन्यात अटक केली होती. खंडणीसाठी या आरोपींनी केलेल्या वेगवेगळ्या उद्योगांची माहिती तपासामध्ये समोर आली. पोलिसांना घरझडतीमध्ये माहिती अधिकाराचे तब्बल ६०० अर्ज मिळाले. हे अर्ज त्याने वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये दाखल केले होते. बहुतांश माहिती अधिकाराचे अर्ज त्याने पत्नी आणि वडिलांच्या नावे टाकले आहेत. याशिवाय, त्याने माहिती अधिकाराचा आॅनलाइन वापरही मोठ्या प्रमाणात केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एवढे अर्ज टाकण्याचे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणाला पडत नाही. मांगलेची पार्श्वभूमी बघता त्याने नक्कीच याचा वापर खंडणीसाठी केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
मांगलेकडून ‘आरटीआय’चे ६०० अर्ज हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:20 AM