ठाणे : येथील आझादनगर भागातून सोमवारी सायंकाळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि राबोडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुमारे ६७ हजारांचा देशी, विदेशी मद्याचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.आझादनगर क्रमांक एक जवळील मशान वाडा उद्यानाजवळ बेकायदेशीरपणे मद्य साठा दडविल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाकरे यांच्यासह राबोडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद साईल, एस. टी. जाधव, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेटटी यांच्या पथकाने सायंकाळी ६ वा. च्या सुमारास एका मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहाची तपासणी केली. त्याठिकाणी वरच्या बाजूला देशी, विदेश मद्यासह सुमारे ६७ हजारांचा गाावठी दारुचा साठा हस्तगत करण्यात आला. मंगळवारी ड्राय डे निमित्ताने मद्य विक्रीला बंदी असल्यामुळे हा साठा कोणीतरी ठेवल्याची शक्यता आहे. तो कोणी ठेवला, हे मद्य कोणाला देण्यात येणार होते, याची चौकशी सुरु असल्याचे राबोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठाण्यात देशी-विदेशी मद्याचा साठा हस्तगत
By admin | Published: February 21, 2017 5:53 AM