मुरबाड : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मुरबाड तालुक्यातील नारिवली बांगला पाडा येथील ५६ खिडक्या आणि ८५ दरवाजे असलेल्या वाड्याचे मालक गजानन बांगर (६५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुली असा परिवार आहे.
एकेकाळी म्हसा परिसरातील ४० गावांचा पोशिंदा म्हणून जबाबदारी स्वीकारणारे बांगर यांचे आजोबा कान्हू गोविंद बांगर यांनी १८७० मध्ये बांधलेल्या वाड्याला ५६ खिडक्या आणि ८५ दरवाजे असून या स्थितीत हा वाडा सुरक्षित आहे. ही या वाड्याची ख्याती असून त्यावेळी ठाणे जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्याचे रक्षण कसे करावे हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना पडला असताना त्यांनी जिल्ह्यातील दानशूर व श्रीमंतांची एक सभा बोलावली. त्यावेळी कान्हू हेही सभेला हेले होते. सभा सुरू झाली आणि जिल्हाधिकारी प्रत्येकाला मदतीचे आवाहन करू लागले. त्यावेळी प्रत्येक जण सहकार्य करण्यासाठी हातभार लावू लागला. सभा संपण्याच्या तयारीत असताना कान्हू बांगर हे पुढे आले आणि म्हणाले की मी म्हसा परिसरातील ४० गावांना एक वर्षभर मोफत धान्य पुरविण्याची जबाबदारी घेतो. वर्षभर नागरिकांना धान्य पुरेल तेवढा साठा या वाड्यात उपलब्ध होता. आपल्या आजोबांचा दानशूरपणाचा वारसा हा बांगर कुटुंबीय आजपर्यंत जोपासत आले आहेत.