लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरातील तीन मजल्यांच्या व्यंकटेश इमारतीची गॅलरी खालील दुकानावर पडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली आहे.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब, गॅलरी पडण्याचे सत्र सुरू असून, धोकादायक व जुन्या इमारतीमधील नागरिक भीतीच्या छायेखाली राहत आहेत. कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान २० वर्षांपूर्वीची जुनी ३ मजली व्यंकटेश इमारत आहे. त्याच्या तळमजल्यावर दुकान आहे. इमारतीची गॅलरी दुकानावर पडून दुकानाचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली. इमारतीला महापालिकेने यापूर्वी नोटीस दिल्याने आठ पैकी पाच प्लॉटधारकांनी यापूर्वीच इमारत खाली केली होती. स्थानिक समाजसेवक सुधीर बागुल यांनी इमारत खाली करण्यास सहकार्य केले असून, इमारतीभोवती संरक्षण कठडे उभारण्याची मागणी केली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी इमारतीचे स्लॅब पडून १२ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला.
शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने एक कमिटी स्थापन करून, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र, १५ दिवस उलटूनही कमिटीने कोणतेही आदेश अद्याप न दिल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी अवैध व जुन्या इमारतीबाबत त्वरित निर्णय शासनाने घेण्याची मागणी होत आहे. व्यंकटेश इमारत खाली केल्यानंतर त्यामधील नागरिकांची महापालिकेने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.