उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर यांनी शहरात ऑनलाइन जुगार, मटका जुगाराचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केल्यावरही अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे उघड झाले. नेहरू चौकातील एका जुगार अड्ड्यावर उल्हासनगर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता धाड टाकून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांची रोखड जप्त केली. मायकलसह ३३ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील नेहरू चौक परिसरातील दोन मोठ्या हॉल मध्ये ऑनलाईन जुगार, मटका जुगार, अंदर-बाहेर, तीन पत्ते जुगार सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे प्रमोद गांगुर्डे यांना मिळाली. त्यांनी पथकासह शुक्रवारी सायंकाळी ७ वाहत धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल ३३ जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून २ लाख २७ हजार १९० रुपये जप्त केली. रात्री उशिरा वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका झाली. तसेच दुसऱ्या एका धाडीत मटका जुगार खेळणाऱ्या दोघांना रोख रक्कमेसह अटक केली असून दोन्ही गुन्हे उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.
शहरात ऑनलाइन जुगार, मटका जुगार, तीन पत्ते जुगार, आत-बाहेर जुगाराला सुगीचे दिवस आले असून चौकात, मार्केट मध्ये, गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशन परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर यांनी आवाज उठवून अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणीं केली. मात्र शुक्रवारच्या कारवाईने शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले. अश्या अवैध धंद्याने नवीन पिढी जुगाराच्या आहारी गेल्याची टीका होत आहे.