ठाणे : गणरायाच्या दागिन्यांमध्ये यंदा शाही साज पहायाला मिळत आहे. सोंडपट्टीमध्ये डायमंड, क्लिप, कंठीमध्ये श्रीमंतहार, तर मुकुटामध्ये बालाजी, शाही फेटा असे नवीन प्रकारांचे दागिने यंदा आले आहेत. दुसरीकडे गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती आहे.गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी असताना खरेदीसाठी ठाणेकरांनी वीकेण्डचा मुहूर्त साधला आहे. अॅडजस्टेबल असलेली क्लिप सोंडपट्टी यंदा फॉर्मात आहे. सोंडेच्या आकाराप्रमाणे ती अॅडजस्ट करता येते. ती क्लिप सोंडपट्टी, कडा आणि बाजूबंद म्हणूनही वापरता येते. नेहमी सोनेरी रंगामध्ये दिसणारे उपरणे हे यंदा डायमंड आणि मोत्यांमध्येही पाहायला मिळत आहे. कंठीमध्ये विविध प्रकार पाहायला मिळत आहे. यात मोदक कंठी, जास्वंदी कंठी, त्याबरोबर श्रीमंतहारसारखी असलेली कंठी, पट्टी डायमंड कंठी नव्याने आली आहे. दूर्वाची कंठीदेखील आहे. ती यंदा १५१ रुपयांपासून उपलब्ध आहे. यात वेणी फेटा, पगडी फेटा, डायमंड फेटा मुकुटांमध्ये उपलब्ध आहे. छत्रीमध्येही विविध प्रकार असून ती चार पासून १८ इंचांपर्यंत उपलब्ध आहे. डायमंडची छत्री नव्याने पाहायला मिळत आहे. नियमित मिळणाºया कलशांमध्ये डायमंडचे कलशदेखील आहे, तर एकपासून २१ मोदकांचा संचही उपलब्ध आहे. गणरायाच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी प्रकार पाहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे गौरीसाठी पारंपरिक तनमणी, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, बोरमाळ, शाही हार, श्रीमंत हार, राणी हार, पुतळी हार, लक्ष्मी हार, मेखला, कमरपट्टा, बाजूबंद यासारखे दागिने, तर फॅन्सी प्रकारात डायमंडचे दागिने आहेत. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा फॉर्मिंग दागिनेच घेणे भक्त पसंत करतात.गणरायासाठी दागिने अनेकांनी घेतलेले असतात. त्यामुळे दागिन्यांपेक्षा गणपतीसमोर सजवण्याच्या वस्तू जास्त खरेदी केल्या जात आहेत. त्यात मोदक, केळी, कुंकाचा करंडा, पाच फळे, पूजेचे ताट, केळीचे पान, पानसुपारी यासारख्या साहित्यांची खरेदी होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.बाहेरगावी जाणारे भक्त हे आधीच खरेदी करत असल्याने दीड महिन्यापासून दागिने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. स्थानिक भक्तांची मात्र शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी सुरू असल्याचे सतीश गायकवाड यांनी सांगितले.
गणरायाच्या दागिन्यांना चढला शाही साज, गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 3:29 AM