लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील दादर भागात उभारण्यात येणाऱ्या दोन इमारतींच्या बांधकामाच्या खासगी प्रकल्पासाठी ४० कोटी रुपयांचा फंड पुरविण्याचे प्रलोभन दाखवून एका त्रिकुटाने कळव्यातील प्रकाश द्विवेदी (वय ७५) यांची ६० लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
शासकीय बांधकामाचे कंत्राट घेणारे द्विवेदी यांनी अलीकडेच खासगी बांधकामांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे त्यांना दादर भागातील दोन इमारतींच्या विकासाची कामेही मिळाली होती. परंतु, ४० कोटींच्या या मोठ्या प्रकल्पासाठी त्यांना निधीची गरज होती. असा निधी देणाऱ्याच्या ते शोधात असतानाच श्रीनिवास नामक एका वकिलामार्फत त्यांना शालिनी एंटरप्रायजेसच्या पंडित ऊर्फ मनिकेश चतुर्वेदी यांची माहिती मिळाली. चतुर्वेदी यांनी द्विवेदी यांचा प्रकल्प आणि ठाण्यातील घर पाहून निधी देण्याचे मान्य केले. चतुर्वेदी आणि शर्मा ऊर्फ मनोज स्वेराजी यांनी काही अटींवर हा निधी देण्याचे मान्य केले. त्यासाठी या ४० कोटींसाठी सुरक्षा अनामत म्हणून एक कोटीसाठी सहा टक्के याप्रमाणे १२ महिन्यांची ६० लाखांचे प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगितले.
इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी मिळणार असल्याने द्विवेदी यांच्या मुलाने ६५ लाखांचे कर्ज काढून त्यातील ६० लाखांची रक्कम चतुर्वेदी यांनी सांगितल्याप्रमाणे आरबीएल बँकेच्या खात्यात १६ ऑगस्ट २०२१ ते २३ नोव्हेंबर २०२१ दरम्यान भरली. त्यानंतर या निधीसाठी पाठपुरावा करूनही त्यांना तो ४० कोटींचा निधी किंवा त्यांनी भरलेली ६० लाखांची रक्कमही परत मिळाली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी द्विवेदी यांनी कळवा पोलिसात ३० जूनला मनिकेश चतुर्वेदी याच्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर हे अधिक तपास करीत आहेत. यातील काेणालाही अटक केलेली नसून त्यांचा शाेध घेण्यात येत असल्याचे कळवा पाेलिसांनी सांगितले.