डोंबिवली - स्वामी विवेकानंद यांनी जसे भारत भ्रमण केले होते तसेच गंधार कुलकर्णी यांनीही सायकलने भारत भ्रमण करून युवकांमध्ये मातृभाषेची आवड निर्माण व्हावी, यासाठी जागृती केली, हे खूप प्रशंसनीय आहे, असे मत निसर्गमित्र धनंजय मदान यांनी व्यक्त केले.देशातील २३ राज्यांमधून सायकलने हजारो किलोमीटरचा प्रवास करून कुलकर्णी बुधवारी सायंकाळी डोंबिवलीत परतले. यावेळी डोंबिवली सायकल क्लब, पै फ्रेण्ड्स लायब्ररी व अन्य संस्थांतर्फे क्रीडासंकुल येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मदान बोलत होते. या सोहळ््याप्रसंगी डोंबिवली सायकल क्लबचे संस्थापक डॉ. सुनील पुणतांबेकर, पुंडलिक पै तसेच क्लबचे सदस्य व गंधार यांचे कुटुंबीय आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गंधार हे सायंकाळी ६ नंतर डोंबिवली शहरात आले. ठाकुर्लीतील ९० फूट रस्त्यावर आल्यानंतर अनेकांनी सायकल यात्रा काढत त्यांना क्रीडासंकुलाच्या आवारात आणले. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर कुलकर्णी हे कुटुंबीयांसह श्री गणेश मंदिरात आले. तेथे सर्वांनी आरती केली.गंधार यांनी मातृभाषेच्या प्रसारासाठी सायकलवरून केलेला हजारो किलोमीटरचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. युवी पिढीने त्यांच्याकडून आदर्श घ्यावा, असे आवाहन डोंबिवली सायकल क्लबतर्फे करण्यात आले.दरम्यान, डोंबिवली सायकल क्लबचे काही सदस्य मंगळवारी घोटी येथे त्यांच्या स्वागतासाठी गेले होते.
विवेकानंदांप्रमाणे भारत भ्रमंती, गंधार कुलकर्णी यांचे डोंबिवलीत भव्य स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:03 AM