ठाणे : मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून चौदा महिने सायकलवरून १९८५० किमी पिंजून काढणाºया गंधार कुळकर्णी या तरुणाने आपला प्रवास दृकश्राव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. सायकल आणि मी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना गंधारने जपानमध्ये जशी जपान भाषा वेगळी केली तशा आपण आपल्या भाषा वेगळ््या केल्या का असा सवाल उपस्थित केला. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गंधारने आपला सायकलवरचा रोमहर्षक थरारक प्रवास अत्रे कट्ट्यावरील प्रेक्षकांसमोर उलगडला.
३३ राज्य गंधारने सायकलवरुन पिंजून काढले. विविध राज्यांतील भाषांचे वैशिष्ट्य सांगताना गंधारने तेथील खाद्यसंस्कृतीही उलगडली. भारतातील भाषा पाश्चात्यांनी चार कुळांत विभागल्या. भारतीयांनी आपापल्या भाषेतील साम्य पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? हे विविध राज्यांत फिरल्यावर दिसते. लिपी आणि भाषा या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. पण कोणतीही भाषा कोणत्याही एका लिपीत लिहू शकत नाही. हिंदी लिपी नसून ती भाषा आहे. देवनगरी ही लिपी आहे. आपल्याच भाषांच्या परस्परांमधील साम्य आपण जाणून घेतले पाहिजे असेही गंधारने सांगितले. चोरावर मोर आपण म्हणतो पण मल्याळममध्ये चोर म्हणजे भात आणि मोर म्हणजे ताक त्यामुळे भातावर ताक असा अर्थ होतो. प्रत्येक राज्यात संस्कृतमधील शिक्षण वेगवेगळ््या प्रकारे पाहायला मिळते. संस्कृतमध्ये काय शिकायचे असा प्रश्न विद्यार्थ्याला जेव्हा पडतो तेव्हा त्या अभ्यासाचा भविष्यात काहीही फायदा होत नाही. छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर देवरी गाव असून तेथील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी शाळेतील अभ्यासिकेचे दोन तास आधीच निघावे लागते. याचे कारण तेथील शिक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी या बस नंतर खूप वेळाने विद्यार्थ्यांनी एसटी मिळते. एसटीसाठी विद्यार्थ्यांना तासन तास प्रतिक्षा करावी लागत असल्याचा अनुभव कथन केला. कोकणी भाषा, गोवा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य यांचे चांगले संबंध दिसून येतात. परंतू राजकीय शक्तीमुळे कोकणी आणि मराठी भाषेत दरी निर्माण केली जाते. आपण कोकणी भाषा म्हणून स्वीकारली, गोवा राज्य म्हणून स्वीकरले. असे असताना कोकणी मराठी भाषेतून निर्माण झाली असे आपण म्हणतो तेव्हा गोव्यातील लोक दु:खी होतात. त्यामुळे कोकणी ही आपली बहिण म्हणून स्वीकारावे असे मत मांडताना गंधार पुढे म्हणाला की, भाषांना समांतर स्थान दिले तर परस्परांमधला भेद दूर होईल. कोकणी भाषेला वेगळे अस्तित्व आहे हे मानून पुढे गेलो तर एकात्मता दिसेल. शेवटी प्रश्नोत्तराचा तास रंगला.