कल्याण : कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाच्या एका आधारस्तंभाला तडा गेल्याची माहिती उघडकीस येताच सोमवारी रात्री १०.३० पासून हा पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलाची मंगळवारी प्राथमिक पाहणी केली असता पुलाच्या आधारस्तंभाला पुरात वाहून आलेला कचरा अडकल्याने दूरवरून तडा गेल्यासारखे दिसत असल्याचे जाणवत होते. मात्र, खबरदारी म्हणून पुलाची वाहतूक बंदच आहे. मात्र, बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी केल्यावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण-पडघा मार्गावरील उल्हास नदीवर गांधारी पूल १९९८ मध्ये बांधण्यात आला. तो वाहतुकीसाठी १९९९ मध्ये खुला करण्यात आला. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीच्या वेळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. पुराच्या पाण्याचा फटका पुलाच्या आधारस्तंभाला बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची प्राथमिक पाहणी करण्यासाठी शाखा अभियंता अविनाश भानुशाली घटनास्थळी पोहोचले. मात्र, पुलाच्या आधारस्तंभाजवळ जाण्यासाठी त्यांना बोटच उपलब्ध होत नव्हती. अखेर तीन तासानंतर त्यांना बोट मिळाली. जवळून पाहणी केली असता तेथे मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे वाहून आलेला कचरा आधारस्तंभास अडकल्याचे उघड झाले. प्रत्यक्षात तेथे तडा गेलेला नसल्याचे दिसून आले.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत मानकर म्हणाले, बुधवारी पुन्हा या पुलाच्या आधारस्तंभाची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ अधिकारी येणार आहेत. त्यानंतर पुलाबाबत निर्णय घेतला जाईल.
बापगावचा कल्याणशी तुटला संपर्क
गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने बापगावचा कल्याणशी संपर्क तुटला आहे. कल्याण-पडघा रोडवरील वाहतूक कल्याण-भिवंडी बायपासमार्गे वळविली आहे. त्यामुळे कल्याण-भिवंडी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. बापगावातील नागरिकांना भिवंडी बायपासला वळसा घालून कल्याण गाठावे लागत आहे.
-------------------------