ठाणे : गंधार आयोजित ६ ते १६ या वयोगटातील मुलांसाठी ऑनलाइन एकपात्री अभिनय स्पर्धा नुकतीच पार पडली आणि या स्पर्धेला जवळजवळ १२६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कणकवली, लातूर, बीड, औरंगाबाद, नांदेड, परभणी या ठिकाणाहून म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. इतकेच नव्हेच तर बंगळुरू आणि राजस्थान मधूनही या स्पर्धेसाठी स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत अरुंधती राऊत हीने प्रथम येण्याचा मान पटकविला.स्पर्धेत भाग घेतल्यामुळे आनंदाचे, अनुभवाचं आणि आत्मविश्वासाचे बक्षिस तुम्हांला सर्वानाच मिळाले आहे आणि तेच तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देईल असे मत व्यक्त करीत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विजय गोखले यांनी बक्षिस मिळालेल्या मुलांचे अभिनंदन केले. तसंच ज्यांना बक्षिस मिळाले नाही त्यांचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ, ज्येष्ठ बालनाट्य दिग्दर्शक अशोक पावसकर आणि अभिनेता संग्राम समेळ यांनी केले. नुकताच या स्पर्धेचा ऑनलाईन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विजय गोखले उपस्थित होते.
सर्व परीक्षकांनी स्पर्धकांचे बक्षिसकरून स्पर्धेत भाग घेणे म्हणजेच बक्षिस मिळाल्यासारखेच आहे असे मत संजीवनी समेळ यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये अरुंधती राऊत हिचा प्रथम क्रमांक तर आर्या म्हात्रे व अर्णव शिवलकर यांचा अनुक्रमे द्वितीय व त्तृतीय क्रमांक देऊन गौरव करण्यात आले. तसेच उतेजनार्थ पारितोषिक आयुषी देवस्थळी व तिथी मोरे यांना जाहीर करण्यात आले. "कला जगली पाहिजे किंबहुना ते जगवली पाहिजे म्हणून या मुलांमध्ये नाट्यकलेची आवड निर्माण होईल आणि पुढच्या दहा वर्षानंतर मराठी रंगभूमीला उत्तम कलावंताबरोबर उत्तम प्रेक्षक मिळतील याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन आम्ही केले," असे मत गंधार प्रमुख प्रा. मंदार टिल्लू यांनी व्यक्त केले.