ठाणे : गणेश चतुर्थीबाबत एक ज्योतिषी संभ्रम निर्माण करीत आहेत. पंचांगकर्ते सोमण, दाते, साळगावकर, राजंदेकर, लाटकर, रूईकर यांनी अनेक पंचांग -दिनदर्शिकेत मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी दिली आहे, तीच बरोबर आहे असे ठाम मत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी व्यक्त केले.
सोमण यांनी पुढे सांगितले की, संभ्रम निर्माण करणारे हे ज्योतिषी हे सूर्यसिद्धांत ग्रंथावरून गणित करतात ते गणित स्थूल असते. बाकी इतर आम्ही म्हणजे निर्णयसागर, दाते, कालनिर्णय, लाटकर, रूईकर, राजंदेकर आणि भारत सरकारचे गणित हे दृक् गणित ( म्हणजे जसे आकाशात तसे पंचांगात आणि जसे पंचांगात तसेच आकाशात दिसते) असते. या ज्योतिषाचे पंचांग हे चुकीच्या गणितावर केलेले असते. त्यांची तृतीया समाप्ती १८ सप्टेंबरला सकाळी १०.५३ ला होते. आमच्या पंचांगांप्रमाणे ती दुपारी १२.३८ ला होते.
मंगळवार १९ सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थी दुपारी १.४५ ला संपते. मंगळवार १९ सप्टेंबर रोजीच मध्यान्हाला चतुर्थी असल्याने मंगळवार १९ सप्टेंबरलाच गणेश चतुर्थी दिलेली आहे. ती बरोबर आहे.निर्णयसागर, दाते, कालनिर्णय, लाटकर, राजंदेकर , रूईकर यानी पंचांग --कॅलेंडरमध्ये मंगळवार १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी दिली आहे तीच बरोबर आहे. प्रत्येक सणाला हे ज्योतिषी चुकीच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करीत असतात असेही दा.कृ.सोमण यांनी सांगितले.