ठाणे: कोकणातगणेशोत्सवासाठी आपल्या खासगी वाहनाने जाणाऱ्या गणेशभक्तांना ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून मोफत टोल पासचे वितरण केले जाणार आहे. योग्य ती कागदपत्रे दाखवून संबंधितांनी आपले टोल पास घेण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
आगामी १० ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत कोकण आणि गोवा या भागात जाण्यासाठी खासगी तसेच प्रवासी वाहनांचा उपयोग केला जातो. गणेशोत्सवानिमित्त ८ ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी गणेश भक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी, यासाठी परिवहन विभागाने टोल पास जारी करावेत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले होते.
त्याच पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही त्यासंबंधीची तयारी पूर्ण केली असून कोकणात जाणाºया गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांना टोलमधून सूट देण्याचा पास दिला जाणार आहे. हे पास ठाण्याच्या एलआयसी कार्यालयाजवळील मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गालगतच्या प्रादेशिक परिहवन कार्यालयाच्या खिडकी क्रमांक १६ आणि १८ येथून वितरीत केले जाणार आहेत. ते संबंधितांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून गर्दी न करता या कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी केले आहे.