ठाणे : नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे दिव्यातील तलावाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे दिवा पूर्व, स्टेशन परिसरातील तलावात गणपती विसर्जन करायचे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेल्या दिवा तलाव सुशोभीकरणाच्या आश्वासनाचा सत्ताधारी नगरसेवकांना विसर पडलेला आहे. घाणीच्या तलावात विसर्जन करण्यापेक्षा निदान ठाण्याप्रमाणे कृत्रिम तलाव तयार करून दिवेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा दिवा शीळ मंडल, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांनी केली आहे.दिवा व आजुबाजुच्या परिसरातील लोक दिवा पूर्व, स्टेशन परिसरातील तलावात अनेक पिढ्यांपासून गणपती विसर्जन करायचे. परंतु सध्या दिव्यातील तलावाची अवस्था दयनीय आहे. विसर्जन तर सोडूनच द्या, या तलावाकडे कुणी बघुही शकत नाही, एवढी दयनीय अवस्था झाली आहे. तलावात घाणीचे साम्राज्य पसरले असून, इमारतींचे सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. अशा तलावात विसर्जन करणे म्हणजे एक प्रकारची विटंबनाच करणे होय. याला दिव्यातील आजी, माजी नगरसेवक जबाबदार आहेत असा आरोप भोईर यांनी केला आहे. घाणीच्या तलावात विसर्जन करण्यापेक्षा दिव्यात कृत्रिम तलाव उभारावे, अशी मागणी त्यांनी ठामपा आयुक्तांकडे केली आहे.
दुर्गंधीयुक्त तलावात गणेश विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:52 AM