टिटवाळा : महागणपती श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात ५ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सोहळा सुरू झाला. शुक्र वारी ८ फेब्रुवारीला श्री गणेश जयंतीनिमित्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. सकाळी महागणपतीला चंदनाचा लेप लावून जल, दूध व पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. दुपारी भाविकांनी जन्मोत्सवासाठी मोठी गर्दी केली होती.गणेशमूर्तीला सोन्याचे दागिने आणि मुकुट तसेच सोवळे नेसवून सजवण्यात आले. पुष्पहार, सोन्याचे दागिने व मुकुट चढवून, सोवळे नेसवून देवाला सजवण्यात आले. दुपारी १२.३८ वाजता मंत्रघोषात जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत देवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती व मंत्रपुष्पांजलीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी दानशूर व्यक्ती व मंदिर विश्वस्तांनी पेढे, तीळगूळ, बुंदीचे लाडू, चॉकलेट अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच आलेल्या भाविकांना अन्नदानही करण्यात आले.दुपारी ४ वाजता गणेश मंदिरातून भव्य असा पालखी मिरवणूक सोहळा सुरू झाला. यावेळी मोठ्या जल्लोषात ढोलताशा, टाळमृदंगांसह ज्ञानबा तुकोबा असा जयघोष सुरू होता. शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या तालावर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते. मंदिर विश्वस्त व कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात येत होते. मंदिरात पालखी आल्यानंतर महाआरती होणार आहे.घरोघरी गणपतीचे आगमनटिटवाळा : माघी गणेशोत्सवानिमित्त टिटवाळ्याच्या भागातही बाप्पांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शुक्रवारी घरोघर गणपतीची प्रतिष्ठापना झाली. घरोघरी दीड, अडीच व पाच दिवसांच्या गणपतींचे आगमन झाले. काही ठिकाणी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन व हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्र म झाले. यामुळे सर्व परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.
गणेश जयंती : टिटवाळ्यात जन्मोत्सव उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 2:48 AM