प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : माघ शुक्ल चतुर्थी मध्यान्हकाली असेल त्यादिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. आज १३ फेब्रुवारी रोजी या दिवशी मंगळवार आल्याने अंगारक योग आला आहे. यापूर्वी २०२० मध्ये गणेशजयंती मंगळवारी आली होती. यानंतर सन २०३७ मध्ये गणेश जयंती मंगळवारी येणार आहे. गणेश जयंती मंगळवारी आली तर 'अंगारकयोग ' मानला जातो. असे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. गणेशपूजन सकाळी ७-९ पासून दुपारी २-०३ पर्यंत म्हणजे मध्यान्हकाल संपेपर्यंत करावे असे सोमण यांनी सूचित केले आहे.
सोमण यांनी पुढे सांगितले की, गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘ पुष्टिपती विनायक जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘ श्रीगणेश चतुर्थी ‘ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘ गणेश जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो. माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशचतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेशमूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेशजयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.